
कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे बी. ए. भाग तीन व एम. ए. भाग दोन या वर्गांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर सदिच्छा समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हसीना मालदार यांनी केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य व गायन स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. “विद्यार्थ्यांनी केवळ पारंपारिक शिक्षण क्षेत्रातील करिअर संधी न शोधता एका वेगळ्या वाटेने आपल्या कलागुणांना वाव देत करिअरची नवी दृष्टी विकसित करावी” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात आय. क्यू. ए. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मांडला. तसेच शिक्षकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष जेठीथोर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. धनाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग समन्वयक प्रा. संदिप वाडीकर यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. सरस्वती गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे छायाचित्रणाचे काम विवेक गिरी यांनी पाहिले.
या कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.