


कागल:– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल आणि शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सखीसावित्री मंच आणि सचेतना मंडळ आयोजित ‘जागर आरोग्याचा’ या विषयावर आधारित प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सचेतना मंडळ प्रमुख प्रा. शर्मिला पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. राहुल गनबावले यांनी ‘अंमली पदार्थांना नकार द्या’ या विषयावर आधारित प्रबोधनपर मार्गदर्शन करताना, “भारतामध्ये व्यसनाचे विविध प्रकार आहेत. व्यसनाचा खूप वाईट परिणाम मन आणि शरीरावर होतो. तरुणांचा विनाश या व्यसनामुळे होतो. ताणतणाव हे महत्त्वाचे कारण आहे ज्याने व्यनाधीनता वाढलेली आहे. निसर्गाचा आनंद घेतला तर या ताणतणावावर आपण उपाय योजना नक्कीच करू शकतो” असे प्रतिपादन केले. त्यानंतर डॉ. स्मिता कुरुंदवाडे यांनी मानसिक आरोग्याविषयी बोलताना “धावपळीची जीवनशैली आणि ताणतणाव, कामाचा अतिरेक, सततची स्पर्धा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे मानसिक आरोग्य बिघडत असते त्यासाठी नियमित व्यायाम, योगासने, पुरेशी झोप यासारखे उपाय करणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन केले. त्यानंतर डॉ. शर्मिला पाटील यांनी, “आयुष्यात अनेकदा सुख-दुःख, आव्हाने, संघर्ष आणि अपयशाचे प्रसंग येतात, ज्यामुळे कधीतरी मन खचून जाते. त्यावेळी आपण स्वतःची मानसिक ताकद ओळखून प्रत्येक समस्येवर मात करू शकतो याची जाणीव आपल्या मनाला करून देणे गरजेचे असते.” असे विवेचन केले. त्यानंतर डॉ. सरोज सावंत यांनी निरोगी जीवनशैली याविषयी बोलताना, “मानसिक स्वास्थ्य आणि ताणतणाव व्यवस्थापन, योग्य आहार, व्यायाम, योगा या उपायाने निरोगी आयुष्य जगू शकतो.” असे विवेचन केले. तसेच डॉ. सुजित स्वामी यांनी युवक सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना युवकांच्या समस्या विवेचन करून त्यांना मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचे मार्ग सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आय. क्यू. ए. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य जपण्याचे मार्गदर्शन केले. “अभ्यास, परीक्षा, करियर, कुटुंब, जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींचा आयुष्यावर पडणारा प्रभाव आणि त्यातून आपण केलेले नियोजन व व्यवस्थापन यामुळे जीवनात सुसंगतता निर्माण होण्यास मदत होते तसेच नैराश्य नाहीसे होते.” असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ विभागाकडील प्रा. हसीना मालदार, प्रा. सोमलिंग तेली, प्रा. अश्विनी घाटगे यांच्यासह सखी सावित्री मंच आणि सचेतना मंडळच्या सर्व प्राध्यापक सखी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार सखी सावित्री मंच प्रमुख प्रा. काजल जाधव यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.