ज्यावेळी आपण भारतातील फिटनेस इंडस्ट्रीच्या उत्क्रांतिचा विचार करते त्यावेळी नक्किच असे दिसते की फिटनेसशी संबंधित साहित्य-साधने तसेच सेवा-सुविधा या बाबतीत सध्या प्रचंड घडामोडी व बदल अतिशय जलद गतीने होत आहेत. फिटनेस सेक्टर अशा वळणावर आले आहे जिथून या क्षेत्राचा सकारात्मक विकास अतिशय जलद गतीने होणार आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच जिम आणि फ़िटनेसने भुरळ घातली आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि मोबाईलेच्या माध्यमातून महितीची सहजगतीने होणारी देवाण-घेवाण यासाठी खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरते. सध्याच्या धावपळीच्या युगात फिट असावे असे सर्वांनाच वाटते आणि यासाठी फिटनेसच्या बाबतीतील सर्वच घटक सहजासहजी उपलब्ध होत असतील तर या क्षेत्राची आवड व कुतूहल तर वाढणारच. कमी वेळेत नावीन्यपूर्ण आणि रोमांचक अनुभवातुन शरीरसंपदा मिळवता येत असेल तर अशा पर्याय कोणीही आवडीने निवडतील. यातच एरोबिक्स, झुंबासारख्या नवनवीन व्यायाम पद्धतींची भर पडली आहे. आरोग्य आणि शरीर संपत्ती मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी अशा पद्धतींचा वापर होणे स्वाभाविक आहे.
अनेक लोक शरीरसंपदा कमावण्यासाठी फिटनेस सेंटर, जिमचा आधार घेतात. ज्यांनी शरीरसंपदा कमावलेली आहे ते सक्रिय जीवनशैली आणि नवीन आनंदाच्या शोधात जिमकडे वळतात. त्यातून रोमांचक अनुभव घेणे आणि जीवनाचा आनंद लुटणे हा एकच उद्देश असतो. यातच भरीस भर म्हणून बॉडी बिल्डिंग, पॉवरलिफ्टींग यासारख्या व्यावसायिक खेळांकडे मुलांचा वाढणारा कल हे सुद्धा जिम आणि फिटनेस सेंटरच्या यशाचे कारण आहे. आणि कदाचित यामुळेच तालीम आणि आखाडा या पारंपारिक संस्कृती मागे पडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार झालेली नवीन उपकरणे वापरण्यासाठी अतिशय सोपी आणि सुलभ आहेत. ही उपकरणे आणि साहित्य साधने फिटनेस इंडस्ट्रीच्या यशस्वी वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरत आहेत. फक्त फिटनेस इंडस्ट्रीतच नाही तर सध्या खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, क्रीडा सल्लागार, पालक हे सर्वजणच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खेळातील अत्युच्च पातळी गाठण्यासाठी करत आहेत.
स्मार्टफोनच्या जगात सर्वच जण अतिशय स्मार्ट झालेले आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार झालेली फिटनेसशी संबंधित उपकरणे ही स्मार्टफोनला अतिशय सहज गतीने जोडली जाऊ शकतात. याचा वापर फिटनेस सेंटर्स मध्ये अतिशय प्रभावीपणे केला जात आहे. रोजचा वर्कआउट काय असेल, कसा असेल, त्यातून किती कॅलरीज बर्न होतील, या वर्कआउट साठी लागणारा वेळ इत्यादीसारख्या अनेक गोष्टी कोणत्याही व्यक्तीला त्याचा फिटनेस ट्रेनर उपकरणांच्या वापरातून आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून सहजासहजी करून देऊ शकतात. आर्म बँड,डिजिटल घड्याळ, फिटनेस बँड इत्यादी सारखी उपकरणे आपल्या शरीराची माहिती आपल्याला करून देतात. आपण किती चाललो, किती धावलो, आपला व्यायाम किती झाला, किती वेळ आपण व्यायाम केला, व्यायामादरम्यान आपल्या ह्रदयाचे किती ठोके पडत होते, आपल्या चालण्याचा अथवा धावण्याचा वेग किती होता आदीसारख्या अनेक गोष्टींची माहिती आपणास या उपक्रमांच्या माध्यमातून होते. ही माहिती आपल्याला सेव्ह करून ठेवता येते व आपल्या तंदुरुस्तीची प्रगती कितपत झाली आहे अथवा नाही याचा अंदाज घेता येतो.
सध्या तरुणाईमध्ये पिळदार शरीरयष्टी कमावण्याची क्रेझ आहे.चित्रपटातील नायकासारखी आपली सुद्धा शरीरयष्टी असावी असे प्रत्येक तरुणाला वाटते. त्यामुळे फिटनेस सेंटर मध्ये जाणे ही काही तरुणांची पॅशन आहे तर काहींची फॅशन. जिम मध्ये जाऊन खडतर प्रशिक्षण घेणे आणि त्याद्वारे शरीरयष्टी कमावणे हा सध्याचा तरुणाई मधला ट्रेंड आहे. शारीरिक कष्ट तरुणांना शारीरिक दृष्ट्या सक्षम तर बनवतेच पण त्याचबरोबर मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि काही प्रमाणात सामाजिक दृष्ट्या सक्षम सुद्धा बनवते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक कष्ट तरुणांना मानसिक समाधान देते. तरुण वयात स्वतःला ताणण्याची क्षमता समजल्यास त्याचा फायदा भविष्य बांधणीसाठी होतो. फक्त मुलांमध्येच नाही मुलीं मध्ये सुद्धा हा ट्रेंड सध्या दिसून येतो. हम भी कुछ कम नही असे म्हणत मुलीसुद्धा सध्या इन्टेन्सिटी ट्रेनिंग मेथडचा वापर करताना दिसतात. अनेक मित्रांमध्ये व मैत्रिणींमध्ये फिट राहण्यासाठी चढाओढ असलेली आपणास पहावयास मिळते. यामुळेच जवळजवळ सर्वच तरुणाई आपल्याला जीम कडे आणि विविध ट्रेनिंग सेंटरकडे झुकलेली दिसून येते.
फिटनेस इंडस्ट्री मोठी होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याकडे सर्वांचा बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन. अनेक मुले जिम साठी व फिटनेस ट्रेनिंगसाठी असलेले विविध कोर्स पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना रोजगार प्राप्त होतो. मोठमोठ्या जिम मध्ये आणि ट्रेनिंग सेंटर्समध्ये वेल क्वालीफाईड ट्रेनर्सची गरज असते. तसेच काही लोकांना पर्सनल फिटनेस ट्रेनर ची गरज असते. ऍडव्हान्स नॉलेज असलेल्या ट्रेनरकडून प्रशिक्षण घेतल्यामुळे कमी वेळेत चांगले रिझल्ट मिळतात. सध्याच्या युगात कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा मिळवणे हा उद्देश असतो. पर्सनल ट्रेनर मुळे हा उद्देश सफल होण्याची शक्यता असते.
कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणारे लोक त्यांच्या फिटनेससाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या कंपनीच्या इमारतीत जिमची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे कंपनीतील कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार कधीही व कोणत्याही वेळी जिम करू शकतात. कंपनीतर्फे या जिममध्ये फिटनेस ट्रेनर नेमलेला असतो. त्यामुळे बाहेर वेगळे पैसे देऊन जिम जॉईन करण्यापेक्षा कंपनीतील जिमचा वापर करण्यावर या कर्मचाऱ्यांचा भर असतो.जिम, ट्रेनिंग सेंटर, स्विमिंग, सायकलिंग अशा काही माध्यमातून कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता उत्तम ठेवली जाऊ शकते. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपाचा विचार करता या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक क्षमतांकडे लक्ष देऊन यांची कार्यक्षमता वाढवणे आणि कामाचा ताण कमी करणे हाच कंपनीचा जिम सुरू करण्यामागचा उद्देश असतो.
सीनियर सिटिझन खऱ्या अर्थाने फिटनेस कॉन्शियस झालेले आपल्याला पहावयास मिळतात. खोलवर विचार केल्यास असे दिसते की फिटनेस इंडस्ट्रीने गेल्या काही वर्षात ज्येष्ठ नागरिकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. जे लोक जीवनामध्ये बरीच वर्ष व्यायाम करत नाहीत, आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत ते लोक त्यांच्या निवृत्तीनंतर व्यायामाकडे वळलेली दिसतात एकतर निवृत्तीनंतर अथवा एखादा विकार जडल्यानंतर हे लोक व्यायामाकडे वळतात.अशा लोकांना सशक्त व फिट करण्यासाठी फिटनेस इंडस्ट्री आपल्याकडे खेचते. फिटनेस सेंटर्स मध्ये अशा लोकांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी ट्रेनर असतात. हे ट्रेनर त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत फिटनेस ट्रेनर हा ट्रेनर म्हणून कमी आणि हेल्थ प्रोव्हायडर म्हणून जास्त काम करतो. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांच्या सोयीप्रमाणे कधीही हेल्थसेंटर कडे कडे जाता येते. याचा दुसरा फायदा म्हणजे हेल्थ सेंटर मध्ये अशा लोकांचा चांगला ग्रुप तयार होतो व ते उतारवयामध्ये एकमेकाचे सवंगडी बनतात आणि उर्वरित जीवन आनंदी बनवायचा प्रयत्न करतात.
अनेक ठिकाणी आपण योगा क्लासेस आणि योगा सेंटर सुरू झालेली पहातो. सध्याचा योगा हा सर्वात मोठा फिटनेस ट्रेण्ड आहे. दैनंदिन कामकाजातून ताजेतवाने होण्यासाठी योगा हा अतिशय उत्तम मार्ग आहे. मानसिक संतुलन चांगले राखण्यासाठी प्राणायाम केली जातात. योगा सेंटर्समध्ये प्रशिक्षित मार्गदर्शक असतात जे योगविद्येचे ज्ञान सर्वांना देतात. ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे योगविद्या. बऱ्याच लोकांना योगविद्या बद्दल पुरेसी माहिती नसते. अशा वेळी योगा क्लासेस आणि योग सेंटर्सच्या माध्यमातून ही माहिती करून घेतली जाते. म्हणूनच योगाचा क्लास किंवा योग सेंटर हे सुद्धा फिटनेस इंडस्ट्री चे भागच मानले जातात. चाळिशीनंतर अनेक लोक योगाचा आधार घेतात. यामुळेच सध्या योग सेंटर शिफ्ट मध्ये सुरू असलेली आपणास दिसतात.
काही ठिकाणी फिटनेस ग्रुप तयार झालेले आपल्याला दिसतात. एखाद्या व्यक्तीला व्यायाम करायचा झाल्यास अथवा शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे असे वाटल्यास हे ग्रुप त्यांना मदत करतात, सर्व प्रकारची माहिती पुरवतात. त्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. नवीन व्यायामाची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीस अशी माहिती मिळाल्यास त्याला व्यायामाची भीती वाटत नाही तसेच त्याच्या शंकांचे समाधान होते व व्यायामातील त्याचा इंटरेस्ट वाढतो. हाच या फिटनेस ग्रुपचा मुख्य उद्देश असतो.
या सर्व कारणांमुळेच सध्या भारतातील फिटनेस इंडस्ट्री मोठ्या फॉर्ममध्ये आहे. आपल्याला माहित असलेल्या फिटनेस सेंटरचे रूप बदलल्यामुळेच त्याचे रूपांतर एवढ्या मोठ्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये झालेले आहे. म्हणूनच हजारो रुपयांमध्ये होणारी उलाढाल सध्या कोटीमध्ये होत आहे असे आपणास दिसून येते.
– प्रा. श्रीनिवास पाटील