


सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे स्थानिक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे, नामांकित आस्थापना कंपन्या आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून थेट मुलाखती आयोजित करणे, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मुलाखतीद्वारे तात्काळ नोकरी मिळवून देणे. अशा हेतूने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर रोजगार मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन रोपट्याला जल अर्पण करून मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांनी केले. त्यांनी उमेदवार आणि रोजगाराच्या संधी हे दोन्हीही उपलब्ध आहेत पण त्यांचा समन्वय साधणे आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सारंग लक्ष्मण कापूरकर व कौशल्या विश्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील वाढती बेरोजगारी आणि त्यांना उपलब्ध रोजगार यामध्ये संतुलन राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांनी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी रोजगार करण्यासोबतच दुसऱ्यांसाठी रोजगार उपलब्ध करणारे बनावे आणि महत्त्वकांक्षा बाळगून उद्योजक बनण्याचे स्वप्न पहावे व ते सत्यात उतरावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच शून्यातून स्वर्ग निर्माण करण्याचे सूत्र लक्षात ठेवून आपल्या कौशल्यानुसार रोजगार मिळवून आपले ध्येय पूर्ण करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्यामध्ये घाडगे पाटील इंडस्ट्रीज लि. उचगाव, ॲक्सिस बँक राजारामपुरी कोल्हापूर, प्राईम इंडस्ट्रीज फाईव्ह स्टार एम. आय. डी. सी. कागल, एस. बी. रिशेलर्स प्रा. लि. एम. आय. डी. सी. शिरोली, ऑनटोजेन डिजिटल प्रा. लि. कोल्हापूर, ट्रिओ एंटरप्राईजेस एम.आय.डी.सी. शिरोली, सप्रे प्रिसिझन टेक्नॉलॉजीस एम. आय. डी. सी. शिरोली, मौर्या ग्रुप फाईव्ह स्टार एम. आय. डी. सी. कागल, यशस्वी ग्रुप कोल्हापूर, मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रा. लि. जुना बी. पी. रोड कोल्हापूर, पी. ए. एम. एस. पुणे, एस. बी. आय. लाइफ अशा एकूण १२ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी वीरेंद्र प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व कंपन्यांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक बाबुराव पुंडे, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मेळाव्यात महाविद्यालयातील एकूण १८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ५६ विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. सदर कार्यक्रमाचे आभार शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्रीनिवास पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. संदिप वाडीकर व प्रा. शिल्पा कुंभार यांनी केले.
या रोजगार मेळाव्यासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


