


कागल:–दि.कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल आणि शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सखी सावित्री मंच, समुपदेशन व आरोग्य विषयक जाणीव समिती आयोजित जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुप्रिया कातवरे (एच. एस. सी. व्ही. सी. विभाग प्रमुख) यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. राहुल गनबावले यांनी ‘अंमली पदार्थांना नकार द्या’ या विषयावर आधारित प्रबोधनपर मार्गदर्शन करताना, “भारतामध्ये व्यसनाचे विविध प्रकार आहेत. व्यसनाचा खूप वाईट परिणाम मन आणि शरीरावर होतो. तरुणांचा विनाश या व्यसनामुळे होतो. ताणतणाव हे महत्त्वाचे कारण आहे ज्याने व्यनाधीनता वाढलेली आहे. निसर्गाचा आनंद घेतला तर या ताणतणावावर आपण उपाय योजना नक्कीच करू शकतो” असे प्रतिपादन केले. त्यानंतर डॉ. स्मिता कुरुंदवाडे यांनी मानसिक आरोग्याविषयी बोलताना “धावपळीची जीवनशैली आणि ताणतणाव, कामाचा अतिरेक, सततची स्पर्धा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे मानसिक आरोग्य बिघडत असते त्यासाठी नियमित व्यायाम, योगासने, पुरेशी झोप यासारखे उपाय करणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन केले. त्यानंतर डॉ. शर्मिला पाटील यांनी, “आयुष्यात अनेकदा सुख-दुःख, आव्हाने, संघर्ष आणि अपयशाचे प्रसंग येतात, ज्यामुळे कधीतरी मन खचून जाते. त्यावेळी आपण स्वतःची मानसिक ताकद ओळखून प्रत्येक समस्येवर मात करू शकतो याची जाणीव आपल्या मनाला करून देणे गरजेचे असते.” असे विवेचन केले. त्यानंतर डॉ. सपना मंगम यांनी निरोगी जीवनशैली अवलंबिण्याचे महत्त्व प्रतिपादन केले. तसेच डॉ. सुजित स्वामी यांनी युवक सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना युवकांच्या समस्या विवेचन करून त्यांना मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचे मार्ग सांगितले. तसेच डॉ. सतीश काटकर, डॉ. वैशाली सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्रा. पी. एस. पुजारी (कनिष्ठ विज्ञान विभाग प्रमुख) उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सखी सावित्री मंचच्या सर्व प्राध्यापक सखी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनश्री टिकोळे यांनी केले तर आभार सखीसावित्री मंच प्रमुख (विज्ञान विभाग) प्रा. अश्विनी संकपाळ यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.