


कागल:– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे गुणीदास फाउंडेशन कोल्हापूर, निर्धार कोल्हापूर, अक्षरदालन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय व वाचनकट्टा विभाग आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. संदिप वाडीकर (वाचनकट्टा विभाग प्रमुख) यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. पूजा पालकर यांनी करून दिला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समीर देशपांडे (डेप्युटी चीफ रिपोर्टर, दैनिक लोकमत) उपस्थित होते. त्यांनी वृत्तपत्राची भूमिका आणि वाचन या विषयावर आधारित मार्गदर्शन केले. त्यांनी, “वाचनाने माणूस घडतो. पण काय वाचावे याचे ज्ञान असणे गरजेचे असते. वृत्तपत्रातून घरबसल्या जगभराची माहिती काही रुपयात जनसामान्यांपर्यंत पोहोचते. वृत्तपत्रे सर्वसामान्य जनतेची मित्र आहेत.” असे प्रतिपादन केले. त्यांनी विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी जीवनात सुसंगतता निर्माण करून योग्य मार्गाने यश कसे मिळवावे, नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगावे याविषयीसुद्धा मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली. त्यांनी “जीवनात चांगले ग्रंथ वाचावे. त्याबद्दल इतरांनाही माहिती द्यावी. त्यातूनच वाचन संस्कृती वृद्धींगत होईल आणि प्रत्येकाला वाचनाची आवड निर्माण होईल.” असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमावेळी सतीश माने (डी. वाय. एस. पी. कोल्हापूर), दिलीप बनछोडे (गुणीदास फाउंडेशन प्रतिनिधी), अमेय जोशी, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले, आय. क्यू. ए. सी. विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, प्रा.अमरसिंग रजपूत (शिवाजी विद्यापीठ, सिनेट सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शर्मिला पाटील यांनी केले. तर आभार प्रा. अपूर्वा लोकरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.