


कागल:– दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल इतिहास विभाग आणि आय. क्यू. ए. सी. विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने (बी. ए. भाग ३) इतिहास विषयाच्या सत्र सहावे NEP 2020 च्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय “शिक्षक क्षमतावृद्धी” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक व स्वागत कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. रणजीत पाटील यांनी करून दिली. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक (अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित होते. त्यांनी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदल आणि शिक्षकांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्राचे बीजभाषक म्हणून डॉ. अवनीश पाटील (इतिहास विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित होते. त्यांनी आपल्या बीजभाषणातून एकूणच NEP 2020 च्या सुधारित अभ्यासक्रमाचा सूक्ष्म व सखोल असा आढावा घेतला. तसेच शिक्षकांच्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांची चर्चा केली. AI च्या युगात विद्यार्थ्यांना क्षमतावृद्धी साधनांचा वापर कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्रासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर उद्घाटन सत्राचे आभार प्रा. विश्वजीत खाडे यांनी मानले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्राच्या प्रमुख वक्त्यांची ओळख डॉ. लखन भोगम यांनी करून दिली. सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी ‘प्राचीन भारताचा इतिहास’ या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून दिली. तसेच विरूपाक्ष मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, बदामी गुहा, शिल्प, चित्रांची कला, बोधीस्तंभ, जातककथा, अजिंठा लेणी अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्रथम सत्राचे दुसरे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रणजीत माने यांनी धर्म, कला, वास्तुकला, शीख धर्माची धार्मिक स्थळे, मुगलकालीन लघुचित्रे, राजकारण, अर्थव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीधर शिंदे व प्रा. डॉ. तानाजी हवालदार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यशाळेच्या द्वितीय सत्राच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. अभिजीत पाटील यांनी करून दिली. सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुरेश शिखरे यांनी ‘स्थानिक इतिहासाचे उपयोजन’ आणि ‘इतिहास लेखनाचे तंत्र’ याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी ग्रंथ सूची, साधने, अहवाल लेखन, सादरीकरण, फॅमिली ट्री, विद्यार्थ्यांचे स्थानिक इतिहासाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी शिक्षकांनी करावयाचे प्रयत्न याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षा डॉ. आरती नाडगोंडा उपस्थित होत्या.
तिसऱ्या सत्राच्या प्रमुख वक्त्यांची ओळख डॉ. धनाजी पाटील यांनी करून दिली. या सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुरेश चव्हाण यांनी ‘मराठा साम्राज्याचा विस्तार आणि ऱ्हास’ याविषयी मार्गदर्शन केले. तर दुसरे वक्ते प्रा. डॉ. जनार्दन जाधव यांनी ‘आधुनिक जगाचा इतिहास’ याविषयी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षा डॉ. स्वाती सरोदे आणि डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
समारोप सत्राचे स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांनी केले. या सत्राच्या प्रमुख पाहुण्या डॉ. कविता गगराणी (इतिहास विभाग प्रमुख, न्यू कॉलेज कोल्हापूर) यांनी एकूणच NEP 2020 नवे शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी एकूणच बदलत्या अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेतला. समारोप सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सदर कार्यशाळेविषयीचे समाधान व्यक्त केले. सदर कार्यशाळेतील सर्वच प्रमुख वक्त्यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यशाळेचे आभार प्रदर्शन डॉ. रणजीत पाटील यांनी केले. तर संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा कुंभार यांनी केले.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान, इंटरनेट विभाग प्रा. मंगेश कोलप यांनी पहिला. भोजनव्यवस्थेचे काम महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. लखन भोगम यांनी पाहिले. तसेच प्रा. विनायक खोत, प्रा. पूजा पाटील प्रा. अंजली पाटील यांनी नोंदणी व प्रमाणपत्र विभागाचे काम यशस्वीपणे पार पाडले. फलक लेखनाचे काम प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी केले. तर छायाचित्रणाचे काम विवेक गिरी यांनी पाहिले. सदर कार्यशाळेसाठी एन. सी. सी. विभाग व इतिहास विभागाचे विद्यार्थी – विद्यार्थिनी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
सदर कार्यशाळेसाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रा. बिपीन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. प्रवीण चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


